पुणे : खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करुन मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आले. या प्रकरणी खराडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी खडी क्रशर (स्टोन क्रशर) चालक आहेत.

सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रुपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता), प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत मेट्रोतील ठेकेदााराने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ४० वर्षीय ठेकेदार मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी आहे. सध्या ते गहुंजे भागात राहायला आहेत. आरोपी झुरुंगे याच्याशी त्यांची ओळख झाली होती. ठेकेदाराने झुरुंगे याच्याकडून खडी खरेदी केली होती.. खडी क्रशर व्यवसायासाठी जागा दाखवितो, असे सांगून आरोपींनी त्यांना मंगळवारी (१४ एप्रिल) खराडी आयटी पार्क परिसरात बोलावले. तेथील एका उपाहारगृहाजवळ ते दुपारी बाराच्या सुमारास थांबले होते. आरोपींनी त्यांना जागा दाखविण्याचा बहाणा केला. आरोपींनी त्यांना मोटारीतून एके ठिकाणी नेले. त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास खराडी परिसरात सोडून आरोपी पसार झाले. घाबरलेल्या व्यावासायिकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसंनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करुन पसार झालेल्या पाच आरोपींना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.