पुणे : कोंढव्यात गांजा विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. ‘मकोका’ कारवाई करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. यस्मिन करीम शेख (वय ४२), आमीर समीर शेख (वय १९, दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा), शमा उर्फ जोहराबी मुस्ताक शेख (रा. महात्मा फुले वसाहत, कमेला स्लाॅटर हाउस, कोंढवा) अशी ‘मकोका’ कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आरोपींच्या दोन साथीदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
यस्मिन, आमीर, शमा हे कोंढवा परिसरात गांजा विक्री करत होते. काही दिवसांपासून यस्मिन आणि आमीर यांना गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. तेव्हा कोंढव्यातील गांजा विक्री प्रकरणाचा छडा लागला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. कोंढवा परिसरात गांजा विक्री करणे, स्वारगेट भागात दहशत माजविणे अशा प्रकारचे गुन्हे आरोपींनी यापूर्वी केल्याचे निष्पन्न झाले होते .
कोंढवा पोलिसांनी आरोपींविरुद्ध ‘मकोका’ कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रशांत मंडले, उपनिरीक्षक संतोष चौधरी, सागर पवार, रवींद्र गावडे, शेखर कोळी, शरद वाकसे आणि पथकाने ही कारवाई केली.
कुरिअर कामगार दागिने घेऊन पसार
सराफांकडील ९० लाख ३३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मुंबई पोहोचविण्यासाठी निघालेला कुरिअर कंपनीतील कामगार पसार झाल्याचे उघडकीस आले. मुंबईला निघालेला कामगार वाकड परिसरात प्रवासी बसमधून उतरून पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली असून, पसार झालेल्या कामगाराचा खडक पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी कुरिअर कंपनीतील २० वर्षीय कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कामगार मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. याबाबत एका कुरिअर व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाची छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील राष्ट्रभूषण चौकात कुरिअर कंपनी आहे. या कंपनीच्या पुण्यासह सहा शहरांत शाखा आहेत. कुरिअर ने-आण करण्याची जबाबदारी कामगाराकडे सोपविण्यात आली होती. कामगार मुंबईतील शाखेत काम करत होता. पुण्यातील सराफांनी ५ ऑगस्ट रोजी दिलेले ९० लाखांचे दागिने घेऊन कामगार मुंबईला निघाला होता. पुण्यातून तो खासगी प्रवासी बसमधून निघाला. त्यानंतर तो मुंबईतील कार्यालयात दागिने घेऊन पोहोचला नाही. तेव्हा व्यावसायिकाला शंका आली.
व्यावसायिकाची खासगी प्रवासी बसचालकांशी ओळख आहे. त्याने बसचालक, तसेच वाहकांकडे चौकशी केली. तेव्हा ५ ऑगस्ट रोजी कामगार वाकड पुलाजवळ बसमधून उतरल्याची माहिती मिळाली. कामगाराचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या कामगाराचा खडक पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
