पुणे : मद्यपी तरुणाकडून डाॅक्टरांना धक्काबुक्की करून रुग्णालयात तोडफोड करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. या प्रकरणी मद्यपी तरुणा विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका डाॅक्टरांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टरांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा येथे रुग्णालय आहे. आरोपी हा बुधवारी (१८ मार्च) दुपारी पाऊणच्या सुमारास रुग्णालयात आला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. डाॅक्टरांनी मलमपट्टी केली. वैद्यकीय उपचाराचे त्यांनी पैसे मागितले. तेव्हा आरोपीने पैसे देण्यास नकार देऊन डाॅक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रुग्णालयात त्याने गोंधळ घातला. त्यानंतर त्याने रुग्णालयातील काच फोडली. काचेचा तुकडा एका रुग्णाच्या हाताला लागल्याने जखम झाली. डाॅक्टरांना दगड फेकून मारला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

वाहनाच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू

पुणे : वाहनाच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी भागातील एका सोसायटीच्या आवारात घडली. या प्रकरणी वाहन चालका विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४२ वर्षीय महिला विश्रांतवाडीतील टिंगरेनगर भागात असलेल्या तिरुपती सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीच्या आवारात तक्रारदार महिलेने मांजराचे पिलू पाळले आहे.१७ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सोसायटीच्या आवारात वाहनाने पिलाला धडक दिली. मांजराच्या पिलाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेनेे पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.