पुणे : पत्नीशी वाद झाल्याने एकाने घरातील साहित्य पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली. घरातील साहित्याने पेट घेतल्याने तीन पाळीव मांजरांचा मृत्यू झाला, तसेच गृहोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले.

याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३६ वर्षीय महिला आणि तिचे पती सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत राहायला आहेत. महिला आणि पती यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. ९ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादातून पतीने घरातील साहित्य पेटवून दिले. साहित्याने पेट घेतल्यानंतर पत्नी घाबरून घरातून बाहेर पळाली. आगीत गृहोपयोगी साहित्य, तसेच मोहिनी यांनी पाळलेल्या तीन पाळीव मांजरांचा मृत्यू झाला. घराला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर रहिवाशांनी तेथे धाव घेतली. पाणी ओतून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत पत्नीला दुखापत झाली नाही. घर पेटल्यानंतर आरोपी पती पसार झाला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले तपास करत आहेत.

वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण

वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन त्याला सदनिकेत डांबून ठेवून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी तरुणाला मारहाण करून विवस्त्रावस्थेतील चित्रफीत तयार केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २१ वर्षीय तरुण दत्तवाडी भागात राहायला आहे. आरोपींशी त्याचा वाद झाला होता. वादातून तरुणाचे ५ जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपींनी दत्तवाडी परिसरातून अपहरण केले. त्याला दुचाकीवर बसवून कर्वेनगर भागात नेले. तेथील एका सदनिकेत त्याला डांबून ठेवण्यात आले. आरोपींनी त्याला मारहाण केली. फिर्यादी तरुणाला कपडे उतरविण्यास सांगितले. तरुणाची विवस्त्रावस्थेतील चित्रफीत तयार केली. त्यानंतर जखमी अवस्थेतील तरुणाला रात्री साडेआठच्या सुमारास दत्तवाडी भागात सोडून आरोपी पसार झाले, असे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.