Pune Mephedrone MD drugs seized: मेफेड्रोन (एमडी) विक्री प्रकरणात अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करून अनिस शम्मू सय्यद (रा. कल्याणी पार्क, मांजरी बुद्रुक), हरी उत्तम उफाडे यांना मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत त्यांच्या साथीदारांची नावे मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने प्रतीक दत्तात्रय होले (रा. लोणीकंद), ऋषीकेश अंकुश यनभर (रा. कारेगाव, ता. शिरुर) यांना ताब्यात घेतले.

मेफेड्रोन विक्री प्रकरणात वाघोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरारी असलेल्या रमेश उदाराम सुतार (रा. योजनानगर, लोहगाव) याला ताब्यात घेण्यात आले. सुतार मूळचा राजस्थानचा आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या भागात कारवाई करून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक लाड, शेख, गोसावी, पांडुळे, देवकाते, चव्हाण यांनी ही कारवाई केली.

दुचाकीस्वाराकडील रोकड लुटणारे अटकेत

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर मद्यविक्री दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून दोन लाखांची रोकड लुटून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दोन लाखांची रोकड, दुचाकी, कोयता, मोबाइल संच असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नऱ्हे पोलीस, तसेच गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ही कारवाई केली.

यश सतीश खवले (वय २०), ऋषिकेश उद्धव लाखे (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात एका मद्यविक्री दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून दोन लाखांची रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नऱ्हे पोलीस, तसेच गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.

बाह्यवळण मार्गावरील श्री स्वामी नारायण मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत लूटमार करणारे दोघे जण थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून पकडले. चौकशीत दोघांनी लूटमार केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून दोन लाखांची रोकड, दुचाकी, कोयता, मोबाइल संच असा तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार, नऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे आदींनी ही कारवाई केली.