पुणे : मद्यपी मोटारचालकाने रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस शिपायाला धक्काबुक्की केल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबु्क्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलीस शिपाई प्रशांत नायडू यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मोटार चालक मुंढव्यातील रेल्वे उड्डाणपुलावरुन निघाला होता. लोणकर वजनकाट्याजवळ भरघाव मोटारीने एका ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रात्रपाळीत गस्त घालणारे पोलीस कर्मचारी प्रशांत नायडू तेथे गेले. मोटार चालकाने नायडू यांना शिवीगाळ केली.

‘तुम्ही पोलीस विकले गेले आहेत. बलात्कार होतो. तुम्ही तेथे जात नाहीत. आम्हाला त्रास देता’, असे सांगून नायडू यांना धक्काबुक्की केली. नायडू यांच्याकडील मोबाइल संच घेऊन त्याने जमिनीवर आपटला. मोटार चालकाने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मोटारचालकाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.

फुकट पेट्रोल देण्यास नकार दिल्याने मारहाण

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी फुकट पेट्रोल भरण्यास नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

राज पवार, प्रेम गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक प्रतीक सोळुंके (वय २१) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार, गायकवाड आणि साथीदार हे १६ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्ती परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ केली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. दुचाकीच्या टाकीत पेट्रोल भर. पैसे देणार नाही’, असे सांगून आरोपींनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पेट्रोलचे पैसे न देता आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिीरक्षक सोनटक्के तपास करत आहेत.