पुणे : मुलावर करणी केली असून, त्याचा मृत्यू होणार असल्याची भीती दाखवून नाशिकमधील भोंदू दाम्पत्याने एका महिलेची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दाम्पत्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत एका ५३ वर्षीय महिलेने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोंदू दाम्पत्य नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरात राहायला आहे. फिर्यादी महिला, तिचे पती आणि मुलगा लोहगाव भागात राहायला आहेत. मुलाला मानसिक त्रास होत असल्याने २०२३ मध्ये त्याने समाजमाध्यमात एक चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत नाशिकमधील भोंदू दाम्पत्याने प्रसारित केली होती. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या मुलाने भोंदू दाम्पत्याशी संपर्क साधला.
त्यानंतर आरोपी दाम्पत्य त्यांच्या घरी आले. मुलाला पिशाच्चबाधा झाली असून, अघोरी पूजा करावी लागेल, असे आरोपींनी महिलेला सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिलेला गुंगीचे ओैषध देण्यात आले. पूजेसाठी दोन लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. महिलेकडून त्यांनी पैसे उकळले. त्यानंतर उज्जैन येथील स्मशानभूमीत विशेष पूजा करावी लागेल, असे सांगून आरोपींनी पुन्हा अघोरी पूजा केली. महिलेला कोलकात्ता, जेजुरी, नाशिक येथे नेण्यात आले. पिशाच्चबाधा दूर करतो, असे सांगून आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी तीन लाख ९० हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यनंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील तपास करत आहेत.
नसरापूर अत्याचारप्रकरणी प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष
नसरापूर अत्याचार प्रकरणात तीन प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष विशेष न्यायालयात मंगळवारी नोंदविण्यात आली. आरोपीने बालिकेला पत्र्याच्या शेडमध्ये नेताना पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शी मुलांनी सांगितले. येरवडा कारागृहात झालेली ओळख परेड आणि न्यायालयात आरोपीला व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे हजर केल्यानंतर मुलांनी त्याला ओळखले.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्र दिनी घडली. या प्रकरणी पोलिसांनी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला अटक केली. गुन्हा घडल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध १४ दिवसांत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालायत सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी ८२ साक्षीदारांची यादी न्यायालायात सादर केली. या प्रकरणात बालिकेचे आई-वडील, आजी, पंचनामा करणारे पंच यांची साक्ष नोंदविण्यात आली. बालिकेला घटनेच्या दिवशी आरोपीने पत्र्याच्य शेडमध्ये नेताना तीन मुलांनी पाहिले होते. या तीन मुलांची साक्ष मंगळवारी विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. आरोपीने मुलांना हटकले होते. आरोपीने मुलांना पाहून त्यांना दगड फेकून मारला, असे त्यांनी न्यायालयात सांगितले.
येरवडा कारागृहात आरोपीची ओळख परेड झाली होती ओळख परेडमध्ये त्याला मुलांनी ओळखले होते. या प्रकरणात मुलांचा न्यायालयासमोर जबाब नोंदविण्यात आला होता.
