पुणे : गावठी दारू विक्री, जुगार, तसेच गंभीर गुन्हे करणाऱ्या परिमंडळ सातमधील दहा गुंडांना पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले. अभिजित संजय जाधव (वय २९), साईनाथ विठ्ठल पाटोळे (वय २७), अविनाश मुरलीधर मेटे (वय ३६), गगन तानाजी शिंदे (वय २४), संकेत अमोल बांदल (वय २७), मच्छिंद्र शंकर पवार (वय ३८), सचिन भीमराव मातंग (वय २५), आदित्य बापू शिंदे (वय २५), बिरा रामदास श्रीराम (वय ३८), मालती संतोष मलके (वय ४५) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध चंदननगर, लोणीकंद, वाघोली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर त्यांना शहर अणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिले.
आतापर्यंत १०० गुंड तडीपार
पुणे पोलिसांच्या परिमंडळ सातमध्ये लोणीकंद, वाघोली, खराडी, चंदननगर, लोहगाव, विमानतळ, येरवडा या पोलीस ठाण्यांच्या समावेश होतो. गेल्या काही महिन्यात पोलिसांनी कारवाई करुन परिमंडळ सातमधील १०० गुंडाना तडीपार करण्याचे आदेश दिले. तडीपार केलेले गुंड शहरात दिसल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धनकवडीत दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’कारवाई
धनकवडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुंडाची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यत आली आहे. रोहन राजेंद्र रोेंगे (वय २१, रा. गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.
रोंगे याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे सादर केला.
या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नुकतीच मंजूरी दिली. त्यानुसार रोंगे याची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वर्षभरासाठी त्याला कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त मोहिते, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, सहायक निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, बापू खुटवड, अमोल पवार, विनायक एडके, गोरख ढगे, योगेश ढोले, सागर सूतकर यांनी ही कारवाई केली.
