पुणे : शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड परिसरात दहशत माजविणाऱ्या नऊ गुंडाना दोन वर्षांसाठी शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले. एकाच वेळी नऊ जणांना तडीपार करण्यात आल्याने सराइतांना जरब बसली आहे.
जालिंदर मसा मोरे (वय ४८, रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर (वय २६, रा. अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (वय २३, रा. बिबवेवाडी), राजु महादेव डेंगळे (वय २२, रा. सुखसागर नगर), आकाश गुलाबराव कांबळे (वय २१, रा.), कृष्णा बबन लोखंडे (वय २४, रा.), आर्यन बापु बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक), सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३, रा. मार्केटयार्ड), साहिल भिमा अष्टगे (वय २०, रा. मार्केटयार्ड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात वाढती गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाचा बिमोड करण्यासाटी पोलिसांनी कडक पावले उचललेली आहेत.
गुन्हेगारी टोळ्या, तसेच सराइतांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याने नऊ जणांना तडीपार करण्यात आले. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वेळेवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने आणि त्यांच्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी ही कारवाई केली.
नगर रस्त्यावर बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नगर रस्त्यावर भरधाव प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तुषार दत्तात्रय लोंढे (वय २२, रा. आनंदनगर, वाघाेली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत साई हरिभाऊ लोंढे (वय २१, रा. आनंदनगर, वाघोली) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार तुषार लोंढे हा गुरुवारी (२६ फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाला होता. वाघोली परिसरात भरधाव प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने दुचाकीस्वार तुषारला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुषारला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
पसार झालेल्या बस चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत. नगर रस्ता भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत दुचाकीस्वार, तसेच पादचारी मृ्त्युमुखी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. बहुतांश अपघात बस चालकांच्या बेदरकारपणामुळे झाले आहेत.
मोटारीचे सुटे भाग विक्री करणाऱ्या दुकानात चोरी
सजावटीसाठी लागणाऱ्या मोटारीचे सुटे भाग विक्री करणाऱ्या दुकानातून चोरट्यांनी पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना खराडी भागात घडली. याबाबत एका व्यावसायिकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे खराडीतील आपले घर सोसायटी परिसरात सजावटीसाठी लागणाऱ्या मोटारीचे सुटे भाग (कार ॲक्सेसरीज) विक्री करण्याचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा पत्रा कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी पावणे चार लाख रुपयांचे सुटे भाग चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.

