पुणे : एका राष्ट्रीयकृत बँकेत गोंधळ घालून कर्मचारी, तसेच व्यवस्थापाकाला शिवीगाळ करण्यात आल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. या प्रकरणी खडक पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे गुलटेकडी भागात राहायला आहेत. याबाबत बँक व्यवस्थापक श्रीआंश श्रीदेव सिंग (वय ३९, रा. राॅयल एनरिच सोसायटी, भोसले गार्डन, हडपसर ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भवानी पेठेतील कल्पतरु प्लाझा येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत व्यवस्थापक आहेत. आरोपी सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी दी़डच्या सुमारास बँकेत आले. बँकेतील कर्मचाऱ्यांना त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी हे बँक व्यवस्थापक सिंग यांच्या दालनात शिरुन त्यांना मारण्याच्या प्रयत्नात होते.
सिंग यांनी या घटनेची माहिती बँकेतील सुरक्षारक्षक सोमनाथ जगताप यांना दिली. आरोपींनी सुुरक्षारक्षक जगताप यांना धक्काबुक्की करुन जिवे मारण्याची धमकी दिली, असे सिंग यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.
टोळक्याकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की
रस्त्यावर फटाके फोडण्यास मज्जाव करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला टोळक्याने धक्काबु्क्की केल्याची घटना अरण्येश्वर परिसरात घडली. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई राहुल उन्हाळे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आरोपींनी अरण्येश्वर परिसरात फटाके फोडले. रात्रपाळीत गस्त घालणारे पोलीस शिपाई उन्हाळे यांनी त्यांना हटकले. रस्त्यात फटाके फोडू नका, तसेच मधोमध लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपींनी उन्हाळे यांना धक्काबुक्की केली. झटापटीत उन्हाळे यांचा गणवेश फाटला. शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कोपनर तपास करत आहेत.
