पुणे : भांगमिश्रीत गोळ्यांची विक्री प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी एकाला अटक केली. पानात या गोळ्यांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडून भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांची पाकिटे, टेम्पो असा तीन लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विष्णू गुप्ता (वय ४१, रा. मारुंजी, हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी गुप्ता याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर परिसरात पोलीस नाईक सचिन जाधव हे गस्त घालत होते. त्या वेळी गुप्ता हा भांगमिश्रीत गोळ्यांची (बंटा) विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती जाधव यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावला. गुप्ता याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून भांगमिश्रीत गोळ्यांची पाकिटे, तसेच टेम्पो जप्त करण्यात आला. गुप्ता याची चौकशी करण्यात आली. चौकशीत भांगमिश्रीत गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याची माहिती त्याने दिली. या गोळ्या पानात टाकून नशा करण्यात येत असल्याची माहिती त्याने दिली.
पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, सहायक निरीक्षक संतोष पाटील, पोलीस कर्मचारी दीपक चव्हाण, सचिन जाधव, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, श्रीकांत मखरे यांनी ही कारवाई केली.
पर्वती गावात दोघांवर शस्त्राने वार
वैमनस्यातून दोन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना पर्वती परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसंनी एकाला अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम सुधीर वैद्य (वय १९, रा. टिकेकर वाडा, पर्वती गाव), अथर्व सचिन चव्हाण (वय १९) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहित अरुण चक्रनारायण (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैद्य याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्य आणि आरोपींमध्ये वाद झाले होते. २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वैद्य आणि चव्हाण हे लक्ष्मीनगरमधील प्रेमळ विठ्ठल मंदिर परिसरात थांबले होते. त्या वेळी आरोपी चक्रनारायण आणि साथीदारांनी शिवीगाळ केली. वैद्य आणि चव्हाण यांच्यावर शस्त्राने वार करुन त्यांना बॅटने मारहाण केली. या प्रकरणात चक्रनारायण याच्याबरोबर असलेल्या एका महिलेसह अल्पवयीनांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
