पुणे : मैत्रिणीला दूरध्वनी केल्याच्या वादातून मित्राने एकावर कोयत्याने वार केल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आदित्य सुनील कांबळे (वय २०,रा. एस. के. रेसीडन्सी, नवले पुलाजवळ, नऱ्हे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी चेतन बाजीराव कांबळे (वय २३, रा. समर्थ काॅम्प्लेक्स, धनकवडी) याला अटक कररण्यात आली. याबाबत आदित्य याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ‘आदित्य आणि चेतन हे मित्र आहेत. दोघांची एका तरुणीसोबत मैत्री होती. मंगळवारी (२ फेब्रुवारी) आदित्य आणि चेतन भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात रात्री आठच्या सुमारास भेटले. त्या वेळी आदित्यने चेतनच्या मोबाइलवरुन तरुणीशी संपर्क साधला. या कारणावरुन त्यांच्या वाद झाला. त्यानंतर चेतनने शेजारी असलेल्या रसवतींगृहातील कोयता घेतला. कोयत्याने आदित्यवर वार करण्याचा प्रयत्न केला’, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी दिली.
त्यानंतर आदित्य घाबरुन तेथून पळाला. चेतनने त्याचा पाठलाग करुन त्रिमूर्ती चौकातील एका गल्लीत कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. गजबजलेल्या त्रिमूर्ती चौकात ही घटना घडल्याने घबराट उडाली. चेतन तेथून पसार झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या आदित्यला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपी चेतनला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत .
संगमवाडीत कोयते उगारुन टोळक्याची दहशत
येरवड्यातील संगमवाडी भागात कोयते उगारुन टोळक्याने दहशत माजविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. अथर्व रवींद्र सोरटे (वय १९), सिद्धार्थ रवींद्र सोरटे (वय २४), गौरव समाधान शिंदे (वय २०), ओम उर्फ शंभूराज ज्ञानेश्वर फुगे (वय २४, सर्व रा. संगमवाडी, येरवडा), आयुष अनिल जाधव (वय २०, रा. उत्तननगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी अमोल वायाळ यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोरटे, शिंदे, फुगे, जाधव हे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संगमवाडी परिसरात आले. आरोपींनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक उमेश गित्ते तपास करत आहेत.

