पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पोलिसांनी कारवाई करुन ११ महिलांसह १५ बांगलादेशींना पकडले. बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे. ‘बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा बांगलदेशी महिला वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती. बांगलादेशी महिला देहविक्रयात गुंतल्याची माहिती होती. दलालांनी त्यांना वेश्यावस्तीत आणल्याची माहिती मिळाली होती.

यापूर्वी पोलिसांनी या भागात कारवाई करुन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले होते. खडक पोलिसांच्या पथकाने सोमवारी रात्री अकरापासून वेश्यावस्तीत कारवाईस सुरुवात केली. पहाटे पाचपर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईत ११ बांगलादेशी महिला, तीन पुरुष, तसेच एका मुलाला ताब्यात घेण्यात आले’, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली.

चौकशीत बांगलादेशातील एका अल्पवयीन युवतीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त करण्यात आल्याची माहिती मिळाली. पश्चिम बंगालमधील दलाल ज्योती उर्फ सबिना कुंटणखाना चालवित होती. राहुल शर्मा आणि समीर हवलदार हे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. सुमीत चव्हाण हा दोन कुंटणखान्यात चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा प्रमुख आहे.

या कारवाईत पोलिसंनी चार मोबाइल संच, हिशेबाची वही असा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार आणि पथकाने ही कारवाई केली.