पुणे : वेधशाळा चौकात मोटारीला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मोटार चालक बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली.
वेधशाळा चौकातून मोटार चालक नितीन झगडे (रा. बारामती) हे वेधशाळा चौकातून शनिवारी रात्री निघाले होते. त्या वेळी मोटारीच्या दर्शनी भागातून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. एका वाहन चालकाने झगडे यांना सांगितले. झगडे यांनी मोटार रस्त्याच्या कडेला थांबविली. सुरुवातीला नागरिकांनी आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भडकली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या कसबा पेठ केंद्रातील अधिकारी कमलेश चौधरी, संजय गायकवाड, उबेद शेख, सुमित दळवी, प्रसाद नाणेकर, आतिश नाईकनवरे, मयूर चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवले. मोटारीत आग नेमकी कशी लागली, याची माहिती मिळू शकली नाही. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली.
उन्हाळ्यात वाहने पेटण्याच्या घटना घडतात. मोटार, तसेच चारचाकी वाहनांमधील इंजिन गरम होणे, तसेच अंतर्गत भागात शाॅर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात.
फरार गुंड अटकेत
वैमनस्यातून एकावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता.
विशाल बाळासाहेब कांबळे (वय २७, रा. धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या सरइताचे नाव आहे. धनकवडीत २५ ऑक्टोबर रोजी वैमनस्यातून एका तरुणावर कांबळेने कोयत्याने वार केले होते. या घटनेत तरुण जखमी झाला होता. या प्रकरणी कांबळे याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. तो लोहगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अमोल पवार आणिअभिमान बागलाने यांना मिळाली. पोलिसंच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रुपेश जाधव, उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, बापू खुटवड, हवालदार अमोल पवार, निलेश शिवतरे, अभिमान बागलाने, महेश भगत, किरण कांबळे, सागर सुतकर यांनी ही कारवाई केली.

