पुणे : बँकेतून निघालेल्या तरुणाकडील १५ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा डाव नागरिकांच्या तत्परतेमुळे उधळला गेला. चंदननगर परिसरात ही घटना घडली. प्रसंगावधान राखून तरुणाने विरोध केल्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

याबाबत एका तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २३ वर्षीय तरुण एका खासगी कार्यालयात नोकरी करतो. ताे वडगाव शेरी परिसरात राहायला आहे. २७ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन कामकासाठी त्याला बँकेतून रोकड काढून आणण्यास सांगितले होते. रोकड काढल्यानंतर तो दुपारी दोनच्या सुमारास वडगाव शेरीतील श्री हनुमान मंदिर परिसरात आला. त्या वेळी दोन दुचाकीवरून चौघे जण आले. एका चोरट्याने तरुणाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. तक्रारदार तरुणाला धमकावून चोरट्याने त्याच्याकडील १५ हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. तरुणाने प्रसंगावधान राखून चोरट्याला धक्का दिला. दुचाकीवरील दोन चोरटे रस्त्यात पडले. त्यानंतर तक्रारदार तरुणाने दुचाकी सुरू केली. त्याने ऑक्सिजन पार्कजवळील एका चहाच्या टपरीवर दुचाकी थांबविली.

तरुणाचा पाठलाग करत दुचाकीवरून चोरटे तेथे आले. त्यांनी तरुणाला मारहाण करून रोकड असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचा आरडाओरडा ऐकून नागरिक तेथे जमा झाले. नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वार चोरटे तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी ज्येष्ठाला धक्काबुक्की करुन ५० हजारांची रोकड लुटली

पीएमपी प्रवासी ज्येष्ठाला धक्काबुक्की करुन चोरट्यांनी ५० हजारांची रोकड लुटल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. ते २६ फेब्रुवारी रोजी दुपारी विश्रांतवाडी ते कोथरूड या मार्गावरील बसमधून प्रवास करत होते. बस प्रवासात चोरट्यांनी त्यांना धक्का दिला. धक्काबुक्की करुन खिशातील ५० हजारांची रोकड काढून घेतली. चोरटे शांतीनगर परिसरातील बस थांब्यावर उतरुन पसार झाले. घाबरलेल्या ज्येष्ठाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस हवालदार भोसले तपास करत आहेत.

एसटी प्रवाशाची सोनसाखळी चोरी

एसटी प्रवाशाच्या गळ्यातील ८३ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना वाकडेवाडी एसटी स्थानकाच्या आवारात घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे मूळचे नाशिकचे आहेत. ते २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाकडेवाडी एसटी स्थानकाच्या आवारात थांबले होते. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. पोलीस कर्मचारी तागड तपास करत आहेत.