पुणे : माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीला कंटाळून दोन महिलांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटना चंदननगर आणि वाघोलीत घडल्या असून, या प्रकरणी पतीसह इतर नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुण्यात हुंडाबळीसह माहेरहून पैसे आणण्याच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्येच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मोटार आणि घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत यासाठी छळ केल्यामुळे महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ३ जूनला चंदननगरमधील तुकारामनगरात घडली. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती गोरख संभाजी सोनवणे (वय ३३, विशाललीला सोसायटी, तुकारामनगर) याला अटक केली आहे. तर, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनोद धुर्वे पुढील तपास करीत आहेत.
सतत पैशांच्या मागणीला कंटाळून प्रियंका गणेश कांबळे (वय २५ रा. वाघोली) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना १ जून रोजी वाघोलीत घडली आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी पती गणेश दिगंबर कांबळे (वय ३० रा. वाघोली, मूळ- हडको, नांदेड) याला अटक केली आहे. अनिता वाघमारे (रा. कळवा, ठाणे) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे तपास करीत आहेत.
तरूणाला धक्का देऊन रोकड चोरली
रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाला दुचाकीस्वार चोरट्यांनी धक्का देउन त्यांच्याशी झटापट केली. त्यांनतर तरूणाच्या खिशातील २५ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना २९ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास नगर रस्त्यावरील येरवडा मेट्रो स्थानकाजवळ घडली. या प्रकरणी सहकारनगरमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय तरूणाने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण सहकारनगरमध्ये राहायला असून, २९ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते येरवडा मेट्रो स्थानक परिसरातून जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी तरूणाला धक्का दिला. त्यानंतर त्याच्या पायाला दाबून झटापट केली. तक्रारदाराच्या खिशातील २५ हजारांची रोकड चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे आरोपींचा माग काढला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवर तपास करीत आहेत.
११ लाखांच्या दागिन्यांची चोरी
घरकाम करणाऱ्या महिलेने मालकीणीची नजर चुकवून घरातील ११ लाख ५ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना १८ मे ते २ जून या कालावधीत विश्रांतवाडीतील कैलास भवनमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आळंदी रस्त्यावरील कैलास भवनमध्ये राहायला असून, मागील काही महिन्यांपासून त्यांच्याकडे घरकामासाठी एक महिला येत होती. १८ मे ते २ जून कालवधीत तिने तक्रारदार महिलेची नजर चुकवून कपाटातील ११ लाख ५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाची माहिती झाल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करीत आहेत.
