पुणे : नवीन क्रेडीट कार्ड देण्याच्या बहाणा करीत सायबर चोरट्यांनी ५० वर्षीय नागरिकाला एपीके फाईल पाठवली. त्यानंतर संबंधित फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडून सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ७३ हजार रूपये ऑनलाईन पद्धतीने वर्ग करून घेतले. ही घटना १८ जुलै २०२५ रोजी कोथरूडध्ये घडली आहे. या प्रकरणी तक्रारदाराने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, १८ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. नवीन क्रेडीट कार्ड देण्याची बतावणी करीत तक्रारदाराला एपीके फाईल पाठविली आणि डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानुसार तक्रारदाराने फाईल डाउनलोड केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वर्ग करून घेतली. जवळपास पावणेपाच लाख रूपये खात्यातून कमी झाल्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करीत आहेत.

पुणे स्टेशन परिसरात तरूणाची लूट

रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरूणाला जीवे मारण्याची धमकी देत टोळक्याने त्याला २५ हजार रूपये ऑनलाईन वर्ग करण्यास भाग पाडून लुटले. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी बिहारमधील २२ वर्षीय तरूणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चौघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याचा मित्र मूळचे बिहार राज्यातील आहेत. २२ फेब्रुवारी रोजी ते रिक्षातून पुणे स्टेशनला जात होते. त्यावेळी रिक्षातील चौघाजणांनी तरूणाला शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिली. त्याच्याकडून २५ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी करून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक पूजा मदने पुढील तपास करीत आहेत.