पुणे : कौटुंबिक वादातून सुनेने ८० वर्षीय सासूवर स्वयंपाकघरातील सुरीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. या प्रकरणी सुनेला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.सुमन अण्णासाहेब शिंदे (वय ८२, रा. समृद्धी रेसीडन्सी, आंबेगाव बुद्रुक, भारती विद्यापीठ परिसर) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अनुपमा संजय शिंदे (वय ६०) यांना अटक करण्यात आली. याबाबत पोलीस शिपाई मल्लिकार्जुन कोळी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुपमा शिंदे, त्यांचे पती संजय, विवाहित मुलगा, सून आणि सासू सुमन हे एकत्र राहायला आहेत. अनुपमा यांचे पती सेवानिवृत्त आहेत. विवाहित मुलगा नोकरी करतो. अनुपमा यांचा किरकोळ कारणावरुन सासूबरोबर वाद व्हायचा.

मंगळवारी (१२ मे) अनुपमा आणि सुमन घरात होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. वादातून अनुपमा यांनी सुमन यांच्यावर स्वयंपाकघरातील सुरीने सासू सुमन यांच्यावर वार केले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला कोडून घेतले. अनुपमा यांनी कोंडून घेतल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडला. पोलिसांनी घराची पाहणी केली. शयनगृहात सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुमन यांना ससून रुग्णालयात दाखल केले. अनुपमा यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी तपास करत आहेत.

प्रेमविवाह केल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

प्रेमविवाह केल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना ढोले-पाटील रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी तरुणाच्या मेहुण्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किरण धनराज खरात (वय ३१, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी साहिल गौतम जगताप आणि रोहन निगडे (वय ३१, दोघे रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत खरात याने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण खरात हा डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी त्याने एका आरोपीच्या बहिणीशी प्रेमविवाह केला होता. खरात आणि तरुणीच्या प्रेमविवाहास कुटुंबीयांनी विरोध केला होता. खरात आणि आरोपीच्या कुटुंबीयांमध्ये वादही झाले होते. खरात याची पत्नी नुकतीच प्रसृत झाली होती.

शनिवारी (९ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास खरात ढोले-पाटील रस्त्यावर थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांनी खरातला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या खरातला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, हवालदार भागवत या प्रकरणाचा तपास करत आहेत.