पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. खून झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई आकाश कीर्तीकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावर श्री शंकर महाराज उड्डाणपुलाजवळील भुयारी मार्गात एकाच्या डाेक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (११ जुलै) मध्यरात्री घडली. सकाळी एक जण भुयारी मार्गात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती सहकारनगर पाेलिसांना मिळाली.
त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विट्ठल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे रक्ताने माखलेला सिमेंटचा गट्टू, फरशी सापडली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांकडून खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तो फिरस्ता असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसंनी या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव तपास करत आहेत.
कोथरूडमध्ये टोळक्याची दहशत वैमनस्यातून तरुणाला मारहाण
वैमनस्यातून तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. टोळक्याने दहशत माजवून मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना धमकाविल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आनंद शरद कुलकर्णी (वय २६, रा. विश्वश्री सोसायटी, कोथरूड) याने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. १० जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास आरोपींनी कुलकर्णी याला गुजरात काॅलनी परिसरात अडवले. त्याला शिवीगाळ केली. त्यलाा स्टम्प, फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. आरडाओरडा ऐकून नागरिक तेथे जमा झाले. नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.
