पुणे : पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांकडील पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. कोथरूड, तसेच पाषाण परिसरात या घटना घडल्या. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कोथरूडमधील पौड रस्ता परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाकडे पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील चार लाख आठ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना रविवारी (३ मे) घडली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सेनापती बापट रस्त्यावरील जनवाडी परिसरात राहायला आहेत. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची पत्नी दुचाकीवरुन भूगावला निघाले होते. पौड रसत्यावरील जैन लाेहिया आयटी पार्कसमोरील पीएमपी थांब्याजवळ चोरट्यांनी दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाला अडवले आणि पोलीस असल्याची बतावणी केली.
या भागात ज्येष्ठांना लुटण्यात येते. तुमच्याकडील दागिने काढून ठेवा, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्याकडील चार लाख रुपयांची सोनसाखळी कागदात बांधून ठेवण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून सोनसाखळी लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करत आहेत.
पाषाण-सूस टेकडी परिसरात ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची अंगठी आणि सोनसाखळी असा एक लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,दाेन चोर ट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे बाणेर परिसरात राहायाला आहेत. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते पाषाण-सूस टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. पोलीस असल्याची बतावणी केली. पाषाण टेकडी परिसरात ज्येष्ठांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील सोनसाखळी आणि अंगठी काढून घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक मांढरे तपास करत आहेत.
‘मोबाइल चॅटींग’बाबत जाब विचारल्याने महिलेचा खुनाचा प्रयत्न
मोबाइलवरील संवादाबाबत (चॅटींग) जाब विचारणाऱ्या पत्नीसह मुलाला बॅटने मारहाण करण्यात आल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे घडली. महिलेचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास ही क्वीन्स गार्डन परिसरातील आरोपीच्या घरात ही घटना घडली. आरोपी हा मोबाइलवर चॅटींग करत होता. त्या वेळी पत्नीने त्याला जाब विचारला. या कारणावरुन त्याने महिला आणि मुलाला त्याने बॅटने मारहाण केली, तसेच महिलेचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे तपास करत आहेत.
