पुणे : शहरात पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. कर्वेनगर भागात पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी, अंगठी असा एक लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागातील डहाणूकर काॅलनी परिसरात राहायला आहेत. ते ३ मे रोजी कर्वेनगर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी सव्वानऊच्या सुमारास निघाले हाेते. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. पोलीस असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली. या भागात ज्येष्ठांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. तुमच्याकडील दागिने काढून ठेवा, अशी बतावणी केली.त्यानंतर चोरट्यांनी ज्येष्ठाकडील सोनसाखळी, अंगठी असा ऐवज कागदात बांधून ठेवण्याचा बहाणा केला. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सोनसाखळी, अंगठी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक भांबेरे तपास करत आहेत.

फसवणुकीची तिसरी घटना

शहर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. पौड रस्ता परिसरात दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन त्याच्याकडील दागिने लांबविण्यात आली होती. पाषाण -सूस टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ज्येष्ठाकडे बतावणी करुन दागिने लांबविण्यात आले होते. त्यानंतर कर्वेनगर भागात अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली.

पोलिसांचे आवाहन

पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुकीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस तपासणीच्या नावाखाली नागरिकांना दागिने काढून ठेवण्याच्या सूचना देत नाहीत. अशा प्रकारची बतावणी करणारे चोरटे आढळून आल्यास त्वरीत जवळचे पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला (क्रमांक -११२) माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. गुलटेकडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. सौरभ भरत आवळे (वय २४, रा. ढोले मळा, डायस प्लाॅट, गुलटेकडी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आवळे सराईत आहे. गुलटेकडीतील ढोले मळा परिसरात तो थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस हवालदार दिनेश भांदुर्गे आणि सुजय पवार यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आवळेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. आवळेने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याने कोणाकडून पिस्तूल आणले ? यादृष्टने तपास करण्यात येत आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास भारमळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजित पाटील, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, हवालदार दिनेश भांदुर्गे, सागर केकाण, हर्षल शिंदे, अश्रृबा मोराळे, प्रशांत टाेणपे, सुजय पवार, रमेश चव्हाण, सागर काळे, संग्राम किंद्रे यांनी ही कारवाई केली.