पुणे : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांत चोरट्यांनी पाच लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.पहिली घटना केशवनगर-मुंढवा भागात घडली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून पाच लाख आठ हजार रुपयांच्या गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी विशाल देवराम कोकतरे (वय ३२, रा. बी. टी. कवडे रस्ता, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बी. टी. कवडे रस्ता, मुंढवा येथील गायकवाड फार्म येथे राहतात. ४ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान घर बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला व पार्किंगमध्ये ठेवलेल्या गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पोमण करत आहेत.
दुसरी घटना वाघोली भागात घडली. चोरट्यांनी कपाटातील ९० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी वैभव बाबासाहेब ढोरमारे (वय २३, रा. मांजरीखुर्द) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे मांजरी येथील चिंतामणी कॉलनीत राहतात. २८ ते २९ एप्रिल दरम्यान चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ९० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
गोदामाचे पत्रे उचकटून चोरी
वाघोली भागातील एका गोदामाचे पत्रे उचकटून एक लाख ३० हजार ९४३ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर तबाजी कांचन (वय ४१, रा. वाघोली) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांचन यांचे आव्हाळवाडी येथे गोदाम आहे. चोरट्यांनी छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि एक लाख ३० हजार ९४३ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
