पुणे : मध्यभागातील एका लाॅजमध्ये महिलेचे चित्रीकरण केल्याच्या आरोपावरुन एका पत्रकाराविरुद्ध शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका पत्रकाराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली पत्रकाराने बुधवार पेठेतील एका लाॅजमध्ये महिलेचे चित्रीकरण केले होते.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली होती. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे महिलेने तक्रार दिली होती. त्यानंतर तक्रारीची शहानिशा करण्यात आले. चौकशीत पत्रकाराने ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली चित्रीकरण केल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित पत्रकाराविरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या घटनेचा पुणे श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. याबाबत संघाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. ‘अशा गैरप्रकारांचे पत्रकार संघाकडून समर्थन करण्यात येणार नाही. संबंधित पत्रकाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी’, असे पत्रकार संघाने स्पष्ट केले आहे.
प्राचार्याकडे खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक पसार
एका नामांकित महाविद्यालयातील प्राचार्यांविरुद्ध बाललैंगिक अत्याचर (पोक्सो )प्रकरणात अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळणारा पोलीस उपनिरीक्षकासह तिघे जण गुन्हा दाखल होताच पसार झाले आहेत. तिघांचा गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
एका प्राचार्यांविरुद्ध बाललैगिंक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून सात लाख रुपयांची उकळण्यात आल्याची तक्रार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे, सुदाम तायडे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.
एका संगणक अभियंता तरुण-तरुणीला धमकावून त्यांच्याकडून दहा हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किरण अब्दागिरे, पोलीस शिपाई गणेश खाढे, किरण कांबळे यांना निलंबित करण्यात आली. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी याबाबतचे आदेश नुकतेच दिले. त्यानंतर पोलीस आयु्क्त अमितेशकुमार म्हणाले, ‘पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वेगवेगळ्या प्रकरणात सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना पोलीस दलातून बडतर्फ केले जणार आहे.’
