पुणे : कात्रजमधील आंबेगाव परिसरात एका लाॅजमध्ये सुरू असलेला देहविक्रयाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी लाॅजवर छापा टाकून चार तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना देहविक्रयास प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

सचिन बाबुराव गायकवाड (वय २८, सध्या रा. पानसरेनगर, कोंढवा, मूळ रा. मुळज, उमरगा ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कात्रजमधील आंबेगाव भागात द्वारिका लाॅजमध्ये देहविक्रय सुरू असल्याची मााहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसंनी लाॅजमधून चार तरुणींना ताब्यात घेतले. लाॅजमधील व्यवस्थापक गायकवाड याला तरुणींना देहविक्रय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, कोंडे, खेडेकर, इंगळे यांनी ही कारवाई केली.

तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने बांधकाम मजुराचा मृ्त्यू

नियोजित गृहप्रकल्पात तिसऱ्या मजल्यावर काम करणारा बांधकाम मजूर तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना वडगावशेरी भागात घडली. सुरक्षाविषयक काळजी न घेणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी ठेकेदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शंकर डुबकवाड (वय ५१, रा. बाेराटे वस्ती, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. या प्रकरणी ठेकेदारासह तिघांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत डुबकवाड यांचा मुलगा शिवानंद (वय २२) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी भागातील गणेशनगर भागात तीन मजली इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डुबकवाड हे रविवारी (१० मे) दुपारी पावणेचारच्या सुमारास काम करत होते. त्या वेळी तिसऱ्या मजल्यावर खडी उतरवित असताना डुबकवाड यांचा तोल गेला. तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम ठेकेदार, तसेच संबधित इमारतीचे बांधकाम करुन घेणाऱ्या मालकांनी सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नव्हत्या. नियोजित इमारतीच्या परिसरात संरक्षक जाळी बसविण्यात आली नव्हती. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे डुबकवाड यांचा मुलगा शिवानंद याने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सपकाळ (वय ६१, रा. प्रतीकनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा आदित्य (वय २९) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सपकाळ हे ३ मे रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास गोल्फ क्लब रस्त्याने निघाले होते. येरवड्यातील टपाल कार्यालयाजवळ भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीस्वार सपकाळ यांना मदत न करता मोटारचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या सपकाळ यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करत आहेत.