पुणे : तडीपार गुंड, तसेच त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने दहशत माजविल्याची घटना खराडी परिसरात घडली. गुंडाने समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित केली. या प्रकरणी खराडी पोलिसांनी तडीपार गुंडासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी निखिल मधुकर कांबळे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) याच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे सराईत असून, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कांबळे याला परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपार केल्यानंतर कांबळे हा साथीदारांसोबत खराडीतील रक्षकनगर भागात २८ मार्च रोजी सायंकाळी आला.

या भागातील गोल्ड सोसायटीसमोर कांबळे आणि त्याच्याबरोबर असलेले आठ ते दहा साथीदार थांबले होते. आरोपींनी या भागात दहशत माजविली. कांबळेने दहशत माजविण्याची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कांबळेसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल असून, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.

मिठाई विक्री दुकानातून ७० हजारांची रोकड चोरी

मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ७० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मानाराम उमाजी चौधरी (वय ६४, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे बिबवेवाडीतील भारतज्योती सोसायटी परिसरात मयूर स्वीट हे मिठाई विक्रीचे दुकान आहे. ३० मार्च रोजी चौधरी यांनी रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद केले. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले. दरवाज्याचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. गल्ल्यात ठेवलेली ७० हजार रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. चोरट्यांनी दुकानातील मोबाइल संच, तसेच केशर डब्बा चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मिठाई, ओैषध विक्री, तसेच किराणा माल दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड लांबविल्याची घटना वाढल्या आहेत.