Pune Crime News Updates: कोढव्यातील येवलेवाडी भागात आठ वर्षांच्या मुलीवर एकाने अत्याचार केले. अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी पीडित मुलीच्या नात्यातील आहे. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलीचे कुटुंबीय मूळचे नेपाळचे आहेत. उदरनिर्वाहासाठी ते पुण्यात आले होते. येवलेवाडीत किरकोळ काम करून ते उदरनिर्वाह करतात. १४ मे रोजी आरोपीने आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले. मुलीने या बाबतची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीला सोमवारपर्यंत (१८ मे) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येवलेवाडी पाेलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
विश्रांतवाडीत २१ लाखांचे मेफेड्रोन जप्त
मेफेड्रोन (एमडी) विक्रीसाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २१ लाखांचे मेफेड्रोन, तसेच अफुच्या बोंडाचा चुरा जप्त करण्यात आला.
करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित (वय ४१, रा. सिद्धार्थनगर, धानोरी), राजूसिंह सहदेवसिंह राजपुरोहित (वय ४२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई देवीदास वांढरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राजपुरोहित हे मूळचे राजस्थानातील आहेत. १५ मे रोजी विश्रांतवाडीतील धानोरी भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण मेफेड्रोन विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींनी धानोरीतील घरात छापा टाकला. आरोपीच्या घरातून २१ लाख १३ हजार रुपयांचे मेफेड्रोन, तसेच अफुच्या बोंडाचा चुरा जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.
