पुणे : बिल मागितल्याने उपाहारगृह चालक आणि त्याच्या भावावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना लष्कर भागात घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
गौस इस्माईल बागवान (वय १९, रा. कोंढवा) असे जखमी झालेल्या उपाहारगृह चालकाचे नाव आहे. आरोपीने केलेल्या हल्ल्यात बागवान याचा भाऊ जखमी झाला आहे. या प्रकरणी हाशम आतउल्ला शेख (वय ३५, रा. गणेश पेठ) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत बागवान याने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान यांचे लष्कर भागातीत ताबूत स्ट्रीट परिसरात उपाहागृह आहे. आरोपी गणेश पेठेत राहायला आहे. आरोपीने हाॅटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिल दिले नव्हते. बागवान याने त्याला जुने बिल मागितले होते. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. २ जून रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास बागवान ताबूत स्ट्रीट परिसरातील उपाहारगृहाजवळ थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आला. त्याने बागवान आणि त्याच्या भावाला शिवीगाळ केली. दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपीने केलेल्या हल्ल्यात बागवान आणि त्याचा भाऊ जखमी झाला. पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारे अटकेत
पुणे : दहशत माजविण्यासाठी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तसेच काडतूस जप्त करण्यात आले. हडपसरमधील महमदवाडी परिसरात ही कारवाई करण्यत आली.
आकाश संतोष भारती (वय २७, रा. राजगड काॅलनी, ऊरळी देवाची, सासवड रस्ता), दीपक राम बिश्त (वय २०, रा. हांडेवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी विशाल ठोंबरे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती आणि बिश्त यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, दोघे जण हडपसरमधील महंमदवाडी परिसरात थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पाेलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. चौकशीत दोघांनी दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती दिली. दोघांनी पिस्तूल कोणाकडून घेतले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला पकडले
पुणे : शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणाऱ्या गुंडाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. सेनापती बापट रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
प्रथमेश कुमार विटकर (वय २०, रा. कुसाळकर चौक, गोखलेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई वाघेश कांबळे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटकर याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. विटकर याला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर तो पुन्हा शहरात आला होता. विटकर सेनापती बापट रस्त्यावर थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. चतु:शृंगी मंदिरासमारेील गल्लीत सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.
