पुणे : अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजारांची लाच मागणाऱ्या लोहगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. लोहगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली.

मनोज मधुकर बरुटे (वय ३८, रा. गंगा सोसायटी, कळस, आळंदी रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी बरुटे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारादाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे पोलीस उपनिरीक्षक बरुटे यांनी सुरुवातीला ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. तक्रारदाराला लोहगाव पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी (१ मे) सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक बरुटे यांनी बोलाविले. तक्रारदाराक़डून ८० हजारांची लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे तपास करत आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

दारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून

दारू पिताना झालेल्या वादातून केटरिंग व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

मनीषकुमार महादेव पासवान (वय २२, रा. पंचशीलनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी महादेव अर्जुन कांबळे (वय ३५, रा. श्री स्वामी समर्थनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्याथ फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे आणि पासवान हे केटरिंग व्यावसायिकाकडे कामगार म्हणून काम करतात.

केटरिंग व्यावसायिक, तसेच मिळेल ते काम ते करतात. दोघांना दारु पिण्याचे व्यसन आहे. गुरुवारी (३० एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास कांबळे आणि पासवान हे कोंढव्यातील आर. के. काॅलनी परिसरातील टेकडीजवळ असलेल्या झाडाखाली दारू पित बसले होते. त्या वेळी त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी कांबळेने पासवान याच्या डोक्यात दगड घातला. पासवान गंभीर जखमी झाला. कांबळे तेथून पसार झाला. दरम्यान, कांबळेने या घटनेची माहिती भावाला दिली. भावाने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई, पोलीस निरीक्षक दीपक कारंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या कांबळेला पकडले. पोलीस निरीक्षक कारंडे तपास करत आहेत.