पुणे : फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला खराडी पोलिसांनी अटक केली. एका आईने आपल्या १५ वर्षाच्या मुलीच्या समाज माध्यमांवरील वावरावर लक्ष ठेवल्याने पुढील अनर्थ टळल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ओळख असलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला पळवून नेण्याची धमकी दिली. या तरुणाला खराडी पोलिसांनी अटक केली आहे.
अयान नसीम अहमद मलिक (वय १९, रा. थिटे नगर, खराडी, मुळ अथर कॉलनी, कोतवाली, बिजनोर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी व आरोपी अयान मलिक यांची इन्स्ट्राग्रामवरुन ओळख झाली. अयान मलिक हा मूळचा उत्तर प्रदेशामधील राहणारा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो पुण्यात आला आहे. तो खराडीमधील एका केशकर्तनालयात काम करतो. अयान याने मुलीशी इन्स्ट्राग्रामवरुन ओळख काढून बोलणे सुरू केले. तिचा वारंवार पाठलाग करू लागला. मुलीच्या आईला तिची चलबिचल लक्षात आली. अयान विषयी विचारले, त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या आईने खराडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने हालचाल करुन अयान मलिक याला ताब्यात घेतले.  पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक माधुरी बिडवे तपास करीत आहेत.

जुन्या वादातून मारहाण करणारा अटकेत

जुन्या भांडणाच्या वादातून दोघांना बेदम मारहाण करीत ७ हजारांची लुट करणाऱ्याला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २१ एप्रिलला रात्री साडेदहाच्या सुमारास बालेवाडी परिसरात घडली आहे. तेजस सोमनाथ अंभोरे उर्फ प्रीतम (वय २४ रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण आणि त्याचा मित्र २१ एप्रिलला बालेवाडी परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी जुन्या वादातून झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी तेजस त्या ठिकाणी पोहचला. त्याने दोघांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत तक्रारदार तरूणाच्या खिशातील ७ हजारांची रोकड चोरून नेली. दोघांचे मोबाइलही आरोपीने चोरून नेले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.

हेही वाचा

वाढदिवसाला भेट देण्याच्या बतावणीने महिलेला गंडा

विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून सायबर चोरट्याने महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांना वाढदिवसाला परदेशातून गिफ्ट पाठवित असून, त्याची कस्टम ड्युटी भरण्याच्या नावाखाली तब्बल १७ लाख ५७ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना १० फेब्रुवारी ते २६ मार्च कालावधीत वडगावमध्ये घडली. या प्रकरणी महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नोकरानेच मारला डल्ला, ७ लाखांचा ऐवज चोरला

घरकाम करणाऱ्या नोकराने मालकाची नजर चुकवून साडेचार लाखांचे दागिने आणि रोकड असा मिळून ७ लाख ५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ८ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत वानवडीतील फातिमानगरातील मनीष दर्शन सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला फातिमानगरातील मनीष दर्शन सोसायटीत राहायला असून, मागील काही महिन्यांपासून त्यांच्या घरात काम करण्यासाठी नोकर कार्यरत होता.  ८ मार्च ते ९ एप्रिल कालावधीत त्याने महिलेची नजर चुकवून घरातील साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा ७ लाख ५ हजारांचा ऐवज चोरून नेला. तो कामावर येत नसल्यामुळे महिलेला संशय आल्यानंतर त्यांनी ऐवजाची तपासणी केली. त्यावेळी दागिन्यांसह रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.