पुणे : तरुणाच्या त्रासामुळे एका अल्पवयीन युवतीने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बाणेर भागात घडली. आरोपी तरुणाने युवतीची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली होती. १७ वर्षीय युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका २१ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुण मूळचा जालना जिल्ह्यातील शंकरनगरचा रहिवासी आहे. याबाबत तरुणीच्या भावाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी युवती बोलत असल्याने आरोपी तिला त्रास देत होता. आरोपी तरुणाने तिची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली होती. शनिवारी (४ एप्रिल) सकाळी साडेअकराच्या सुमारास युवतीने इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची एक कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४५ वर्षीय तक्रारदाराने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत.

सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात तक्रारदारांशी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांनी त्यांना समाजमाध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले. तक्रारदाराने पैसे गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची सहा लाखाांची फसवणूक

गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदाराच्या सोसायटी पाईपद्वारे गॅस पुरवठा होता. गॅस देयक अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बंँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी खात्यातून सहा लाख रुपये काढून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे तपास करत आहेत.