पुणे : मैाजमजा करण्यासाठी नागरिकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४३ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी राजकुमार सोनू पाटील (वय १९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ), गैारव बाळू खुडे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. येरवडा परिसरात एका पादचाऱ्याचा मोबाइल संच हिसकावून नेण्याची घटना २९ एप्रिल रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पादचाऱ्याचा मोबाइल संच हिसकावणारे चोरटे मोबाइल संच विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईनाथ म्हस्के यांना मिळाली. त्यानंतर तपास पथकाने सापळा लावून पाटील आणि खुडे यांना पकडले. चैाकशीत दोघांनी पुणे रेल्वे स्थानक, तसेच निर्जन रस्त्यांवर पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावून नेण्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तपासात त्यांच्याकडून दोन लाख ६५ हजार रुपयांचे ४३ मोबाइल संच जप्त करण्यात आले.

मौजमजेसाठी आरोपींनी माेबाइल संच हिसकाविण्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक आयुक्त सुनील जैजापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, उपनिरीक्षक किशोर बेरड, शैलेश बावळे, मुकुंद कोकणे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, बालाजी सोगे यांनी ही कामगिरी केली.

मोटारीची काच फोडून नऊ लाखांचे दागिने लंपास

मोटारीची काच फोडून चोरट्यांनी नऊ लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कोथरूड भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यंनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूडमधील डहाणूकर काॅलनी परिसरात राहायला आहेत.

शनिवारी (२ मे) ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागातील एका हाॅटेलमध्ये दुपारी बाराच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले होते. वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीत एका पिशवीत ठेवलेले नऊ लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून चोरटे पसार झाला. हाॅटेलमधून ज्येष्ठ नागरिक जेवण करुन बाहेर पडले. तेव्हा मोटारीची काच फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. हाॅटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.

सदनिकेतून साडेतीन लाखांचे दाागिने चोरी

सदनिकेतून साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना नांदेड सिटी परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नांदेड सिटी परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत.

चोरट्यांनी सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधली. शयनगृहातील कपाटातून दागिने चोरून नेले. कपाटातील दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दागिने लांबविणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.