पुणे : पतीसाेबत होणारे वाद, तसेच दुसरा विवाह करण्यात ११ महिन्यांचा मुलगा अडथळा ठरत असल्याने आईने अकरा महिन्याच्या बालकाचा कपडे धुण्याच्या दगडावर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यात घडली. पुरावा नष्ट करण्यासाठी आईने पोत्यात मृतदेह भरून विहिरीत टाकून दिला. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तपास करुन महिलेला अटक केली.
यश रवींद्र पवार असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी पूजा रवींद्र पवार (वय २२, रा. भांबार्डे) हिला अटक करण्यात आली. पूजा हिचा रवींद्र पवार यांच्याशी विवाह झाला. त्यांना अकरा महिन्यांचा मुलगा आहे. ८ मार्च रोजी पूजा ही अकरा महिन्यांच्या मुलगा यश याला घेऊन घरातून निघून गेली. पत्नी मुलासह बेपत्ता झाल्यानंतर रवींद्र यांनी ८ मार्च रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ५ एप्रिला रोजी पूजा जांबूत गाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. तेव्हा ‘मी झोपेत असताना अकरा महिन्यांचा मुलगा यश हा ओट्यावरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच मी मुलाचा मृतदेह पोत्यात भरला, पोत्यात दगड ठेवला. विहिरीत पोते फेकून दिले’, अशी माहिती तिने पोलिसांना दिली. या प्रकरणी पाेलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. मात्र, तपास आणि शवविच्छेगन अहवालात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचा पूजावरचा संशय बळावला.
पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पुन्हा चौकशी केली. ‘मुलगा सारखा रडत असायचा. मला दुसरा विवाह करायचा होता. मुलगा दुसऱ्या विवाहात अडथळा ठरत असल्याने त्याचा कपडे धुण्याचा दगडावर आपटून खून केला. मृतदेह पोत्यात भरला. पोत्यात दगड टाकले आणि विहिरीत फेकून दिला’, अशी कबुली तिने दिली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक नीळकंठ तिडके, पोलीस कर्मचारी विलास आंबेकर, नितीन भोस, किशोर शिवणकर, नीलम जाधव यांनी या प्रकरणाचा तपास केला.
