पिंपरी : जनगणनेचे काम संपवून घरी परतणार्‍या खासगी संस्थेतील शिक्षिकेला क्षेत्रीय कार्यालयातच थांबवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिक्षिकेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४५ वर्षीय कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी हा महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात नियुक्तीस आहे. पिडीत शिक्षिका शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेत नियुक्तीला आहे. शासनाच्या आदेशानुसार जनगणनेचे काम खासगी शिक्षकांना देखील देण्यात आले आहे. हे काम संपवून पिडीत शिक्षिका ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातून घरी परतत असताना आरोपीने शिक्षिकेला थांबवून ‘दिवसभर रजा टाक. आपण दोघे बाहेर जाऊ’ असे म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाची झाडाझडती

या विनयभंगाच्या घटनेवरून पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत प्रशासनाची झाडाझडती घेतली. अशा घटनांमुळे महापालिकेची बदनामी होत आहे. प्रशासनाच्या चुकीच्या कामांमुळे पदाधिकाऱ्यांनाही बदनामीला सामोरे जावे लागत आहे. कोण जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर आयुक्तांकडे तक्रार करावी. आम्ही पदाधिकारी म्हणून तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दिली.

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक

भारतीय रेल्वे आणि वन विभागात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना बनावट जॉइनिंग लेटर देऊन तब्बल २१ लाख ८७ हजार ७३ रुपयांची फसवणूक केली. ही घटना काळेवाडी येथे ४ एप्रिल २०२३ रोजी घडली.

याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सरकारी नोकरीचे आमिष दाखवले. त्यासाठी एकाकडून सात लाख ८७ हजार रुपये, एकाकडून चार लाख ३० हजार रुपये आणि आणखी एकाकडून नऊ लाख ७० हजार ७३ रुपये असे एकूण २१ लाख ८७ हजार ७३ रुपये उकळले. त्यानंतर त्यांना बनावट जॉइनिंग लेटर व इतर बनावट कागदपत्रे देऊन त्यांची फसवणूक केली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

गांजा बाळगल्या प्रकरणी पोलिसांच्या दोन कारवाया

गांजा बाळगल्या प्रकरणी वाकड, देहूरोड आणि चिंचवड येथे दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये पोलिसांनी वाकड येथील येथील कारवाईत महिलेवर गुन्हा दाखल केला. देहूरोड येथे एकाला अटक केली आहे. चिंचवड येथील कारवाई मध्ये पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टी परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. तिच्या ताब्यातून पोलिसांनी ८ हजार ७०० रुपये किमतीचा १६४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (१६ जून) दुपारी करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

विक्री करण्यासाठी गांजा घेऊन आलेल्या एकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (१६ जून) दुपारी साईनगर मामुर्डी येथे करण्यात आली.  सुखदेव बापू सोनवणे (५५, साईनगर, मामुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण खेडकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साईनगर येथे एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सुखदेव सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ३० हजार ५०० रुपये किमतीचा ६१० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

वाल्हेकरवाडी येथे सोमवारी (१५ जून) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास एक अल्‍पवयीन मुलगा संशयास्पदरीत्या उभा होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून २७ हजार रुपये किमतीचा ५१६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याच्याकडे असलेला गांजा त्याने दुसऱ्या अल्पवयीन मुलाकडून आणला असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांवर एन.डी.पी.एस. ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अविनाश गायकवाड यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.