पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्यचार करणाऱ्या एकाला विशेष न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावासाची तरतूद न्यायालायने निकालपत्रात केली आहे. कुंडलिक गुलाबराव जाधव (वय ४०, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. जाधव याने २७ ऑगस्ट २०२० रोजी दोन अल्पवयीन मुलींना त्याच्या घरी बोलावले. मुलींना त्याने मोबाइलवरील अश्लील चित्रफीत दाखविली. त्यानंतर त्याने एका मुलीला घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने घरात असलेल्या मुलीवर अत्यचार केले.
घाबरलेल्या मुलींनी या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलिसांनी जाधव याला अटक केली. त्याच्याविरुद्ध अत्याचार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात मुस्कान संस्थेच्या वतीने ॲड. गौरव जाचक यांनी बाजू मांडली. ॲड. जाचक यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
सरकार पक्षाकडून सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी जाधव याला २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून द्यावी, तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.
तरुणीचा विनयभंग करणारा ‘डिलिव्हरी बाॅय’ गजाआड
ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बाॅयने एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना शिवाजीनगर गावठाण भागात घडली. पाणी मागण्याचा बहाणा करुन त्याने तरुणीचा विनयभंग केला. पसार झालेल्या डिलिव्हरी बाॅयला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
श्रीधर हरीभाऊ कांबळे (वय २७, सध्या रा. शुक्रवार पेठ, मूळ रा. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर गावठाण परिसरात ६ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कांबळे हा तरुणीच्या घरी आला. तरुणीने ऑनलाइन खरेदी केली होती. वस्तू देत असताना त्याने तरुणीकडे पाणी मागितले. तरुणीने त्याला पाणी दिले. तेव्हा ‘तुम्ही खूप सुंदर दिसता’, असे कांबळे म्हणाला. कांबळेच्या वर्तनामुळे तरुणी घाबरली. तिने आरडाओरडा केला. कांबळे तेथून पसार झाला. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन कांबळेचा मोबाइल क्रमांक मिळवला, तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करत आहेत.
