पुणे : दोन गटातील भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीसश शिपायाला धक्काबुक्की करुन पोलीस चैाकीत गोंधळ घातल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई अभिजित आल्हाट (वय २७) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी भागातील बदामी चौकात २३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन गटात वाद सुरू होते.

दोन गटात भांडणे सुरू असल्याची माहिती पोलीस शिपाई आल्हाट यांना मिळाली. त्यानंतर ते भांडणे सोडविण्यासाठी तेथे गेले. तेव्हा आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन वडगाव शेरीतील महात्मा फुले चौकीत नेले. तेव्हा आरोपींनी पोलीस चौकीत गोंधळ घालून स्वत:ला दुखापत करुन घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस चौकीतील साहित्याची तोडफोड आरोपींनी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बोराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भरत बाेराडे तपास करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी १७ लाखांची फसवणूक

दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बतावणी करुन ओैँध भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक १३ मार्च ते २२ एप्रिल या कालावधीत घडली आहे. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. समाज माध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करुन चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. चोरट्यांनी पोलिसांसारखा गणवेश परिधान केला होता.

एका दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बतावणी चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडे केली. ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून दहशतवाद्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाल्याचे चोरट्यांनी सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाकडे अटक टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. घाबरलेल्या ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी १७ लाख ८७ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत. केंद्रीय तपास संस्थांच्या नावे कारवाईची भीती दाखवून गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांची विशेषत : ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.