पुणे : अमली पदार्थ विक्री प्रकरणात दाखल गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांनी दिले.
केतन उत्तम धेंडे (रा. लोणी काळभोर) असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लोणी काळभोर भागात अमली पदार्थ विक्री प्रकरणात नुकतीच कारवाई केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलीस कर्मचारी धेंडे यांनी या गुन्ह्यातील आरोपींना मदत करावी, यासाटी गुन्हे शाखेतील एका तपासी अधिकाऱ्याला दूरध्वनी केला होता. त्यांना प्रत्यक्ष भेटून त्याने प्रलोभन दाखविले होते. या प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप केला होता. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आल्यानंतर खंडणी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर आरोपींना मदत करण्याचा ठपका ठेऊन धेंडे याला निलंबित करण्यात आले. धेंडे यांचे वर्तन पोलीस दलाचे प्रतिमा मलीन करणारे असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचे खुल्या कारागृहातून पलायन
जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी येरवड्यातील खुल्या कारागृहातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पसार झालेल्या कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि.सातारा) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत कारागृहातील अधिकारी नागनाथ भानवसे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ८ मे रोजी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात भिंगारे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोल्हापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहातून त्याला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात येरवडा येथील खुल्या कारागृहात हलविण्यात आले. त्याची वर्तणूक चांगली होती. कारागृहात त्याला केशकर्तनाचे काम देण्यात आले होते. ८ मे रोजी वरिष्ठ अधिकारी हे खुल्या कारागृहातील शेती विभागाची पाहणी करत होते. त्या वेळी तुती बागेत एक मोबाइल संच सापडला. मोबाइलमध्ये सीमकार्ड नव्हते. या प्रकरणात भिंगारे याच्यासह आणखी एका कैद्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर भिंगारे कारागृहातील बराकीत गेला. चाैकशीसाठी त्याला बोलाविण्यात आल्यानंतर तो बराकीत नसल्याचे उघडकीस आले. पसार झालेल्या भिंगारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सत्रे तपास करत आहेत.
‘बीएसएनएल’ची तार चोरणारे परप्रांतीय चोरटे अटकेत; ८० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील भूमिगत तांब्याची तार क्रेनचा वापर करुन चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांसह नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अस्लम सगीर खान, सलमान इद्रीस मलिक (दोघे रा. दिल्ली), आरिफ कुंदनखाँ खान, शोएब हारून खान, नबी मोहम्मद शान मोहम्मद (तिघे रा. उत्तर प्रदेश), नरेशकुमार शिवशरण (रा. हरयाणा), अनिस अन्सारी, अफाक अन्सारी, प्रवीण बागुल (रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रामटेकडी परिसरात वानवडी पोलिसांकडून सराइताची चौकशी करण्यात येत होती. त्या वेळी रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या परिसरातून भूमिगत तांब्याची तार काही जण क्रेनचा वापर करून काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चोरट्यांना पकडले. चोरट्यांकडून ३४ लाख ८० हजार रुपयांची तांब्याची तार, क्रेन, ट्रक, दुचाकी असा ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक अल्फाज शेख, गोपाळ मदने, अर्षद सय्यद, अभिजित चव्हाण, सर्फराज देशमुख, गणेश भुजबळ यांनी ही कामगिरी केली.
