भंगारचा व्यवसाय करणार्‍या ज्येष्ठ महिलेचा आज पहाटेच्या सुमारास डोक्यात रॉडने हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील वारजे भागात ही घटना घडली असून, खून झालेली ज्येष्ठ महिला सातारा येथे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांच्या मातोश्री होत्या. दोनच दिवसांपूर्वी शहराच्या मध्य भागात पोलीस हवालदाराचा खूनाची घटना ताजी असतानाच, सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शाबाई शेलार (वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचं नाव आहे. वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. रामनगर परिसरातील भाजी मंडईजवळ एक मैदान आहे. तिथेच शाबाई शेलार यांचा भंगारचा व्यवसाय आहे. आज पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी एक जण भंगार विकण्यासाठी आला होता. त्यावेळी शाबाई शेलार या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

भंगार विकण्यास आलेल्या सदरील व्यक्तीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस दाखल झाले, तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. पोलिसांनी शाबाई शेलार यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके यांनी दिली.

मृत शाबाई शेलार यांच्या कुटुंबीयाबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता. सातारा येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांच्या त्या आई असल्याची माहिती समोर आली असल्याचेही खटके यांनी सांगितलं.