पुणे : मद्य विक्री दुकानात काम करणाऱ्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चार लाख रुपयांची रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना मुंबई – बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रोहन रवींद्र कांबळे (वय ३१, रा. इंदू निवास, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड ) याने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरटा आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन एका मद्य विक्री दुकानात कामाला आहे. मद्य विक्री दुकानात जमा झालेली तीन लाख ९९ हजार रुपयांची रोकड घेऊन तो १२ एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास मालकांच्या घरी देण्यासाठी निघाला होता. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात दुचाकीस्वार कांबळे याला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवले. त्याला कोयत्याचा धाक दाखविला. त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन तीन लाख ९९ हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले.

या घटनेनंतर कांबळेने पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी बाह्यवळण मार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक लिटे तपास करत आहेत.

पिस्तूल बाळगणारा अहिल्यानगरमधील सराईत गजाआड

प्रतिस्पर्धी टोळीकडून हल्ला होण्याची भीती वाटल्याने बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला स्वारगेट पोलिसांनी सारसबाग परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.विनोद चंदर शिंदे (वय ३१, रा. बुरूडगाव, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे.

शिंदे याच्याविरुद्ध अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात मारामारी, तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. प्रतिस्पर्धी टोळीकडून हल्ला होण्याची भीती वाटल्याने त्याने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगले होते. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी सगार केकाण, सुजय पवार हे सारसबाग परिसरात गस्त घालत होते.

त्या वेळी एक जण सारसबाग परिसरात थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती केकाण आणि पवार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसंच्या पथकाने सापळा लावला. सणस मैैदानाजवळ असलेल्या एका झाडाखाली शिंदे थांबला होता. पोलिसांना पाहताच शिंदे पळाला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले.

पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल सापडले. त्याच्याकडून पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली. शिंदे पुण्यात कशासाठी आला होता, तसेच त्याने पिस्तूल कोठून आणले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसाडे, उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त धन्यकुमार गाेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास भारमळ, सहायक निरीक्षक अभिजित पाटील, हवालदार दिनेश भांदुर्गे, सागर केकाण, शिंदे, मोराळे, टोणपे, पवार, चव्हाण, काळे, दुधे, घुले, केंद्रे यांनी ही कारवाई केली.