पुणे : सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पाषाण परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत शमसुद्दीन उर्फ समीर चाँदसाहेब ककेरी (वय २६, सध्या रा. कीर्ती गार्डन, पाषाण, मूळ रा. कर्नाटक) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ककेरी पाषाण परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.
१२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ककेरी आणि त्याचा मित्र पाषाणमधील सुतारवाडी परिसरातून निघाले हाेते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ककेरी आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे, असे सांगून चोरट्यांनी त्यांना धमकाविण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी ककेरीची झडती घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याला धमकावून खिशातील ४० हजारांची रोकड काढून घेतले. ककेरीने आरडाओरडा केला. खिशातील रोकड लुटून चोरटे पसार झाले.
ककेरीने गावाला पैसे पाठविण्यासाठी रोकड काढून खिशात ठेवली होती. त्याच्याकडील रोकड लुटण्याची घटना घडल्यानंतर तो घाबरला होता. त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत. नऱ्हे परिसरात मद्य विक्री दुकानात काम करणाऱ्या तरुणाकडील दोन लाखांची रोकड लुटून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
उपाहारगृहातील गल्ल्यातून दोन लाख ३० हजारांची रोकड चोरी उपाहारगृहातील भटारखान्याचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील दोन लाख ३० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना बिबवेवाडी – कोंढवा रस्त्यावर घडली.
या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपाहारगृहाचे मालक सुनील चंद्रशेखर शेट्टी (वय ४०, रा. बिबवेवाडी) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी यांचे बिबवेवाडी – कोंढवा रस्त्यावर उपाहारगृह आहे. चोरट्यांनी मध्यरात्री उपाहारगृहातील भटारखान्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील दोन लाख ३० हजार रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेट्टी यांनी पोलिसांकडे सोमवारी (२० एप्रिल) तक्रार दिली. पोलिसांनी उपाहारगृहाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस हवालदार तायडे तपास करत आहेत.
शहर परिसरात ओैषध विक्री, किराणा माल, तसेच मिठाई विक्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. बाणेर परिसरात एका प्रसिद्ध मिठाई विक्री दुकानातून ६० हजारांची रोकड चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.
ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरी
खराडी परिसरात ओैषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ३० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत विलास गणपत गोडसे (वय ३०, रा. खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री गोडसे यांनी दुकान बंद केले. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.
