पुणे : कौटुंबिक वादातून मुलाच्या हत्येसाठी ७५ लाख रुपयांची सुपारी प्रकरणात पिस्तूल पुरविणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. जंगली महाराज रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आल्यानंतर पिस्तूल पुरविणारा आरोपी पसार झाला होता.
निलेश श्रीकांत गायकवाड (वय २४, रा. पिसोळी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १६ एप्रिल २०२४ रोजी जंगली महाराज रस्ता परिसरात बांधाकाम व्यावसायिकाच्या मुलावर पिस्तुलातून गाेळीबार करण्यात आला होता. मात्र, पिस्तुलातून गोळी न उडाल्याने बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा वाचला. या घटनेनंतर दुचाकीवरुन हल्लेखोर पसार झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात कौटुंबिक वादातून बांधकाम व्यावसायिक पित्याने मुलाची हत्या करण्यासाठी दोघांना ७५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती मिळाली. पाेलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह हल्लेखोरांना अटक केली होती.
गोळीबार प्रकरणात पिस्तूल पुरविणारा आरोपी गायकवाड हा पसार झाला होता. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी पिसोळी भागात गस्त घालत होते. त्या वेळी गायकवाड हा आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गायकवाडला पकडले. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, साहील शेख यांनी ही कारवाई केली.
मद्याच्या नशेत अल्पवयीनांकडून नऊ वाहनांची तोडफोड
मद्याच्या नशेत अल्पवयीनांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना हडपसर परिसरातील फुरसुंगीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.
एका तरुणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण फुरसुंगी परिसरात राहायला आहे. मंगळवारी (३१ मार्च) रात्री पावणेदहाच्या सुमारास चौघे अल्पवयीन क्रांती मित्र मंडळ परिसरात आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. अल्पवयीनांनी शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. परिसरात लावलेल्या तीन रिक्षा, दोन टेम्पो, चार दुचाकी अशा नऊ वाहनांची दांडक्याने तोडफोड केली. घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तपास करत आहेत.
शहर परिसरात वाहनांची तोडफोड, तसेच वाहने पेटवून देण्याच्या घटना वाढल्या आहेत. आठवड्यापूर्वी कौटुंबिक वादातून माहेरी निघून आलेल्या पत्नीची दुचाकी पेटवून देण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एका तरुणाला वारजे पोलिसांनी अटक केली होती. विश्रांतवाडीतील धानोरी भागात वैमनस्यातून सोसायटीच्या आवारात लावलेल्या दुचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली होती.
