पुणे : हडपसर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत १५ व्या मजल्यावर असलेल्या सदनिकेतून संगणक अभियंता तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंता मूळचा ओडिशातील सुगडा गावचा रहिवासी आहे. त्याने सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती. तो शहरातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे पत्नीबरोबर वाद सुरू होते. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. शनिवारी मध्यरात्री त्याने पंधराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केली.

सोसायटीच्या आवारात काही तरी पडल्याचा आवाज झाल्यानंतर रहिवासी जागे झाले. रहिवासी आवारात गेले. तेव्हा राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. राहुल याला तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या घटनेची माहिती राहुलच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली. कुटुंबीय ओडिशाहून पुण्याकडे निघाले आहे.

सिंहगड रस्त्यावर तरुणाला मारहाण करुन खून

 पूर्ववैमनस्यातून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात घडली. शुभम राजू घाेडके (वय २२, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा शनिवारी रात्री सारसबाग परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक पाहण्यासाठी आला होता. मिरवणूक पाहून तो सिंहगड रस्त्यावरुन रिक्षातून घरी निघाला. त्याच्याबरोबर मेहुणा होता. पानमळा परिसरातील वृंदावन नर्सरीजवळ शुभम आणि मेहुण्याने रिक्षा थांबविली. त्या वेळी टोळके तेथे आले. त्या वेळी टोळक्याने शुभमला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण केल्याने त्याला अंतर्गत दुखापत झाली होती. रिक्षातून जात असताना त्याला त्रास होऊ लागला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा रुग्णालायत मृत्यू झाला. पर्वती पोलिसांनी टोळक्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले तपास करत आहेत. प्राथमिक तपासात शुभमचा खून वैमनस्यातून झाला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.