पुणे : आभासी चलन व्यवहारातील (क्रिप्टो करन्सी वाॅलेट) खात्यातून दहा लाखांची रोकड सायबर चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका ४१ वर्षीय तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण बालेवाडी भागात राहायला आहे. तरुणाने आभासी चलन व्यवहारात काही रक्कम गुंतविली आहे. या व्यवहारातील दहा लाखांची रक्कम वाॅलेटमध्ये जमा करण्यात आली होती. सायबर चोरट्यांनी संबंधित वाॅलेटमध्ये तांत्रिक छेडछाड (ब्लाॅकचेन ॲड्रेस, प्रायव्हेट की) करुन दहा लाख रुपयांची रक्कम लांबविली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनेत सायबर चोरट्यांनी तिघांची २५ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने हडपसरमधील काळेपडळ भागात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय तक्रारदाराची सायबर चोरट्यांनी नऊ लाख २३ हजारांची फसवणूक केली. याबाबत एकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करत आहेत. अशाच पद्धतीने मुकुंदनगर भागातील एकाची सायबर चोरट्यांनी नऊ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास भारमळ तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची सहा ७१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एका तरुणाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इरफान नदाफ तपास करत आहेत.
एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून आठ लाखांचे दागिने लंपास
एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार ५४ वर्षीय महिला कात्रजमधील आंबेगाव परिसरात राहायला आहेत. त्या १२ मे रोजी गडहिंग्लज ते पुणे या मार्गावरील एसटी बसमधून प्रवास करत होत्या. कात्रज चौकात दुपारी तीनच्या सुमारास त्या एसटी बसमधून उतरल्या. त्यांनी पिशवीची तपासणी केली . तेव्हा पिशवीतून आठ लाख रुपयांचे दागिने चोरुन नेण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलीस कर्मचारी मासाळ तपास करत आहेत.
