पुणे : ‘शहरात भटक्या श्वानांचा त्रास वाढला असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले, दुचाकीवरुन जाणाऱ्या नागरिकांना भटक्या श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर महापालिका प्रशासनाने तातडीने आवश्यक ती उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा,’ अशी मागणी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली.

चाकण परिसरात दोन दिवसांपूर्वी भटक्या श्वानांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे भाजपच्या नगरसेविका ऐश्वर्या पाटील-पठारे यांनी सांगितले. शहरातील श्वानांची नोंदणी, लसीकरण मोहीम, निवारा केंद्रांची उभारणी, तसेच चावण्याच्या घटनांवर प्रशासनाने तातडीने वैद्यकीय आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

मध्यवर्ती पेठांमध्ये भटक्या श्वानांची समस्या गंभीर होत असल्याचे नगरसेवक कुणाल टिळक यांनी सांगितले. ‘दररोज सुमारे २९४ कुत्र्यांची नसबंदी करण्याची क्षमता असल्याचा दावा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांवर कुत्र्यांची संख्या कमी का होत नाही,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘भटक्या श्वानांसाठी प्रस्तावित छावण्या कधी उभारल्या जाणार, याचा कालबद्ध कार्यक्रम प्रशासनाने जाहीर करावा,’ अशी मागणी टिळक यांनी केली.

‘शहरात भटक्या श्वानांची भीती निर्माण झाली आहे. हा प्रश्न असाच राहिला, तर एक दिवस माणसांपेक्षा श्वानांची संख्या अधिक होईल’, अशा शब्दांत भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी संताप व्यक्त केला. सारसबागेत दररोज सकाळी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात. येथे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना भटक्या श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागात असलेली खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये सर्रासपणे मांसाचे तुकडे या भटक्या श्वानांना दिले जातात त्यामुळे हे श्वान हिंस्र होतात. त्यांना मनासारखे खाद्य न मिळाल्यास त्यांच्यामध्ये बदल होत असल्याचे निरीक्षण यावेळी सदस्यांनी नोंदविले.

नगरसेविका अर्चना पाटील, प्रिया गदादे, अश्विनी लांडगे यांनीही भटक्या श्वानांच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारला. सभागृहनेते गणेश बीडकर यांनी भटक्या श्वानांवर केल्या जाणाऱ्या कारवाईचे दैनंदिन निरीक्षण करण्यासाठी ‘डिजिटल डॅशबोर्ड’ तयार करण्याची मागणी केली.

सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर खुलासा करताना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, ‘शहरातील जुन्या हद्दीत सुमारे १ लाख ६० हजार भटके श्वान आहेत, तर नवीन हद्दीत मिळून ही संख्या सुमारे अडीच ते तीन लाखांपर्यंत जात आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत ३ लाख ३० हजार श्वानांवर नसबंदीची शस्त्रक्रिया केली आहे. श्वानांनी चावा घेतल्यास तातडीने मदत मिळावी तसेच वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी हेल्पलाइन कार्यरत आहे.’