पुणे : नाना पेठेतील बंडू आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी सूरज ठोंबरे आणि साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांवर न्यायालयाच्या आवारात ठोंबरे आणि साथीदार हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी ठोंबरे याच्यासह साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

सूरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ), वेदांत रोहित सावंत (वय २१ रा. धनकवडी), अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१ रा. गुजरवाडी, कात्रज, मूळ रा. नाझरे, भोर), धीरज लखारा (रा. धनकवडी) मानव शरद ढमाले (वय २४, रा. धनकवडी) अशी मकोका कारवाई केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी वेदांत, अथर्व आणि धीरज यांना अटक करण्यातआली आहे. सूरज ठोंबरे आणि मानव ढमाले हे फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

नाना पेठेतील वर्चस्वाच्या वादातून बंडू आंदेकर याचा मुलगा नगरसेवक वनराज आंदेकर याचा दोन वर्षांपूर्वी सोमनाथ गायकवाड टोळीने खून केला होता. सूरज ठोंबरे हा गायकवाड याचा जवळचा साथीदार आहे. गायकवाड कारागृहात आहे. त्याच्या टोळीची सूत्रे ठोंबरे सांभाळत असून, कृष्णा आंदेकरला न्यायालयातून नेत असताना त्याच्यावर हल्ला करण्याचा कट ठोंबरे याने रचला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ठोंबरे याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ठोंबरे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, धमकाविणे, पिस्तूल बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध मकोका कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलिसांनी तयार केला. संबंधित प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ठोंबरे टोळीविरुद्ध मकाेका कारवाईचे आदेश दिले.

विश्रांतवाडीतील गुंड शोएब कुरेशीवर ‘मकोका’ कारवाई

विश्रांतवाडी, येरवडा भागात दहशत माजविणारा गुंड शोएब कुरेशी याच्याविरुद्ध मकोका कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. या प्रकरणी शोएब रशीद कुरेशी (वय २६), हुसेन अस्लम खान (वय २१, दोघे रा. चंद्रमानगर, येरवडा), राज मुकेश सरवदे (वय २१, रा. भीमनगगर, विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. कुरेशीबरोबर गुन्हे करणाऱ्या अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुरेशी आणि साथीदारांनी एका तरुणावर हल्ला केला होता. या गुन्ह्यात कुरेशी आणि साथीदारांविरुद्ध कलमवाढ करण्यात आली. त्यानंतर मकोका कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहायक निरीक्षक सुनील उगले, मनोज शिंदे, सुनील हसबे, बबन वणवे, यशवंत किर्वे यांनी ही कारवाई केली.