पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याची घटना गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली.

राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली. याबाबत इककळकी याची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू इककळकी बुधवारी (१२ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात थांबला होता. आरोपी राजू याचा ओळखीचा आहे. आरोपी प्रेम याने त्याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले हाेते. दारू पिण्यास पैसे न दिल्याने आरोपी त्याच्यावर चिडला होता. आरोपीने राजू याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने त्याच्या डोक्यात दगड घातला.

गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपीने त्याला दगडाने मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक शेळके तपास करत आहेत.

मुलीला नांदविण्यास न पाठविल्याने सासऱ्यावर शस्त्राने वार

माहेरी निघून आलेल्या पत्नीला नांदविण्यास न पाठविल्याने सासऱ्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना माॅडेल काॅलनी भागात घडली. सासऱ्याचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दत्तात्रय भिमाजी विटकर (वय ७०, रा. मारुती मंदिराजवळ, वडारवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विटकर यांचा मुलगा शशिकांत (वय ४०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय विटकर यांच्या मुलीचा आरोपीशी विवाह झाला आहे. कौटुंबिक वादातून विटकर यांची विवाहित मुलगी चार महिन्यांपूर्वी माहेरी निघून आली होती. मुलीला नांदविण्यास पाठवावे, असे आरोपीने विटकर यांना सांगितले होते. विटकर हे माॅडेल काॅलनीतील एका सोसायटीत रखवालदार म्हणून काम करतात. बुधवारी (१२ ऑगस्ट) आरोपी जावई विटकर यांच्या कामावर दुपारी साडेबाराच्या सुमारास गेला. माॅडेल काॅलनीतील सोसायटीच्या आवारात सासऱ्याशी वाद घालून त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. विटकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.