पुणे : तुळशीबागेत दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली.याबाबत एका व्यावसायिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड यांचे तुळशीबागेत रुपश्री इमिटेशन ज्वेलरी हे दुकान आहे. रविवारी तुळशीबागेत खरेदीसाठी गर्दी असते. दिवसभरात जमा झालेली रोकड त्यांनी गल्ल्यात ठेवली होती.
चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील ७० हजारांची रोकड चोरून नेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तुळशीबागेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केेलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.
यापूर्वी तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने, तसेच पिशवीतून रोकड लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत. गर्दीत महिलांकडील दागिने, रोकड लांबविण्याच्या चार ते पाच घटना गेल्या पाच ते सहा महिन्यात घडल्या आहेत.
कार्यालयातून कॅमेरा, मोबाइल चोरी
कर्वेनगर भागातील एका कार्यालयातून चोरट्यांनी महागडा कॅमेरा, तसेच मोबाइल संच असा पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका व्यावसायिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक हे कर्वेनगर भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता यांचे कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीत कार्यालय आहे. चोरट्यांनी कार्यालयातील खिडकीचा गज तोडून आत प्रवेश केला. कार्यालयातील महागडा कॅमेरा, मोबाइल असा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक दीक्षित तपास करत आहेेत.
व्यावसायिकाला धमकावून रोकड लुटली
व्यावसायिकाला धमकावून ६० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील पेरणे फाटा परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत सचिन मोहनराव धर्माधिकारी (वय ३६, रा. डोंगरगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्माधिकारी यांचे पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील पेरणे गाव परिसरात दुकान आहे. ८ मार्च रोजी ते रात्री पावणेनऊच्या सुमारास दुकान बंद करुन घरी निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना पेरणे गाव परिसरात अडवले. त्यांना धमकावून चोरट्यांनी ६० हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.
