पुणे : महिला वर्गाचे खरेदीचे हक्काचे ठिकाण असलेल्या तुळशीबागेत महिलांकडील दागिने, रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील ७२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ५२ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला तुळशीबागेत शनिवारी (४ एप्रिल) दुपारी चारच्या सुमारास खरेदीसाठी आली होती. तुळशीबाग गणपती मंदिर परिसरात चोरट्याने पिशवीत ठेवलेले मंगळसूत्र चोरून नेले.

दुसऱ्या एका घटनेत रविवारी (५ एप्रिल) दुपारी तुळशीबागेत खरेदी करणाऱ्या महिलेच्या पिशवीतून २० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५५ वर्षीय महिला वारजे-एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात राहायला आहे. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास त्या तुळशीबागेत खरेदी करत होत्या. त्या वेळी गर्दीत महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवीतून मंगळसूत्र चोरून नेले. पोलीस कर्मचारी गोरे तपास करत आहेत.

तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. आठवडभरातील ही तिसरी घटना घटना आहे. आठवड्यापूर्वी तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या मुंबईतील एका महिलेच्या पिशवीतून दागिने चोरून नेण्याची घटना घडली होती. यापूर्वी तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने, रोकड चोरीला जाण्याच्या घटना घडल्या हाेत्या. तुळशीबागेतील चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

पादचारी महिलांचे दागिने हिसकावले

एरंडवणे भागात शनिवारी (४ एप्रिल) सकाळी फिरायला निघालेल्या पादचारी महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे दागिने हिसकावून नेण्यात आले. याबाबत एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाजीनगर भागात शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास एका पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख ३४ हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेले. याबाबत महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहगाव परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे रेल्वे स्थानक परिसरात पीएमपी स्थानकात प्रवाशाच्या खिशातील मोबाइल संच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. शहरात पादचारी महिलांकडील दागिने हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.