पुणे : काकाने पुतणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काकाला पोलिसांनी सोलापूर परिसरातून अटक केली.
याबाबत एका अल्पवयीन युवतीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, काकाविरुद्ध बालाकांचे लैंगिक अत्यचाराांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती कुटुंबीयांसह राहते. ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी काका दोन वर्षांपूर्वी युवतीच्या घरी राहत होता. त्यानंतर तो साेलापूरला मूळगावी कुर्डुवाडी येथे गेला होता. १० एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास युवती महाविद्यालयातून घरी निघाली होती. त्या वेळी काकाने तिचा पाठलाग केला. तिला रस्त्यात अडवून विनयभंग केला. या घटनेनंतर युवती घाबरली. तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पसार झालेल्या कुर्डुवाडीतून अटक केली. अटक करण्यात आलेल्या काकाला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पाेलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमाननगर भागातील एका संस्थेतील समुपदेशकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका खासगी संस्थेतील समुपदेशकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींना वैद्यकीय अभ्यासक्रमास (एमबीबीएस) प्रवेश हवा होता. याबाबत त्यांनी चौकशी केली. विमाननगर भागातील एका संस्थेत ते गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आले होते. संबंधित संस्थेतील समुपदेशकाने दोन्ही मुलींना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने त्यांच्या दोन्ही मुलींच्या बँक खात्यातून संबंधित संस्थेच्या बँक खात्यात पाच लाख रुपये जमा केले.
पैसे जमा केल्यानंतर त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्यात आला नाही, तसेच पैसे परत करण्यात टाळाटाळ करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गुंड तपास करत आहेत.
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक
दहशतवाद्यांना पैसे देण्यासाठी बँक खात्याचा वापर झाला असून, या प्रकरणात अटकेची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध काळेपडळ पाेलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. दहशतवादी कारवाईत बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात येणार असून, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी भीती सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला दाखविली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने चाेरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १८ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे नुकतेच उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
