पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेत पाळीव मांजर, तसेच श्वानाचा मृत्यू झाल्याच्या घटना विमाननगर, कोरेगाव पार्क परिसात घडल्या. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विमाननगर भागातील एका सोसायटीच्या आवारात मोटारीच्या धडकेत पाळीव मांजराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका मोटार चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आणि मोटार चालक महिला कोणार्क कॅम्पस सोसायटीत राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्क कॅम्पसच्या आवारातून २२ मे रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास मोटार निघाली होती. मोटारीच्या चाकाखाली सापडून फिर्यादी महिलेच्या पाळीव मांजराचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक हर्षल घागरे तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत कोरेगाव पार्क भागात मोटारीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बोट क्लब रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला राहत असलेल्या सोसायटीच्या आवाराच्या परिसरात एका श्वानाचा वावर होता. मोटारीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या

प्रेमप्रकरणातून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना वारजे माळवाडी भागात घडली. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत तरुणीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका २३ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आराेपी तरुण हा कोथरूड भागात राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी भागात २१ वर्षीय तरुणी राहत होती. आरोपी तरुणाशी तिचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपीने दुसऱ्या एका तरुणीशी मैत्री केली होती. तेव्हापासून तो तरुणीला टाळत होता. तरुणीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने तिच्याशी भांडणे करुन मानसिक त्रास दिला. त्याच्या त्रासामुळे तरुणीने ४ मे रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भांबेरे करत आहेत.

सहकारनगर भागातील एका अल्पवयीन युवतीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचे आमिष दाखविले होते. विवाहास नकार दिल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.