पुणे : लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ करुन पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत दीपक कुंडलिक कसबे (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातंग समाजातील आरक्षणाबाबत सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात शनिवारी (१८ एप्रिल) रात्री बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री दहाच्या सुमारास बैठक संपल्यानंतर लेखक संपत गणपत जाधव तेथे थांबले होते. त्या वेळी आरोपींनी जाधव यांना शिवीगाळ केली. त्या वेळी तक्रारदार कसबे यांनी मध्यस्थी करुन आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी कसबे यांना शिवीगाळ करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांना मारहाण केली.
आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखविला, तसेच पिस्तुलाचा दस्ता कसबे यांच्या डोक्यात मारला, असे कसबे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कसबे यांच्या डोक्यात गोळी झाडण्याची धमकी दिली. त्यानंतर कसबे घाबरले. जिव वाचविण्यासाठी कसबे तेथून पळलो. त्या वेळी आरोपींनी कसबे आणि कार्यकर्त्यांवर ‘पेपर स्प्रे’ फवारला. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, तसेच पट्ट्याने मारहाण केली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.
